Thursday, April 30, 2020

आंधळी कोशिंबीर

ाल आम्ही मुले,मुली,भाऊ सगळेच आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळत होतो.डोळ्यावर पट्टी बांधून एकाला पकडायचे मग त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची..आंधळी पर्यंत ठीक आहे मात्र कोशिंबीर का म्हटलं असावं..रुक्ष अशा जेवणात कोशिंबीर जान आणते..कांदा,टोमॅटो,काकडी,दही,तिखट,मीठ आणि थोडी साखर हे सगळं प्रमाणात असले की कोशिंबीर चवदार होते..आपण आयुष्यात प्रत्येकवेळी आंधळी कोशिंबीरच खेळत असतो.लहानपणी मिळालेले चुकीचे मित्र,तरुणपणात आई वडिलांच्या इच्छेखातर घेतलेले चुकीच्या फॅकल्टीचे प्रवेश,पोटापाण्यासाठी पकडलेली नोकरी,चहा पोह्यांवर दिलेली पसंती, रागारागात गाठलेली कोर्टाची पायरी,अंधपणे निवडलेला फॅमिली डॉक्टर,काढलेली भरमसाठ कर्ज आणि न पाहता,वाचता पन्नास पानावर केलेल्या सह्या,घेतलेले क्रेडीट कार्ड हे सगळे आपण डोळ्यावर पट्टी बांधून निर्णय घेतो आणि मग आयुष्याची आंधळी कोशिंबीर आपण बेचवपणे खात राहतो..कुणावर तरी दोष देत आपण जगत राहतो.आपण घेतलेले निर्णय आपण पंच्पक्वांनासारखे सजवून खायला हवेत.कोशिंबिरीत एखादा जरी माप चुकला तरी आपण बेमालूमपणे पोटभर जेवतो की नाही?अस आयुष्य सजवता यायला हवं..डोळ्यावर पट्टी बांधून स्विकारण्याची क्षमता ज्यांच्यात असते त्यांनी त्याला आनंदाने नदीपार करायला हवा..प्रत्येकाच्या आयुष्यात असे नदीपार करणारे आणि आपल्या पाठीवर भोपळा बांधून पोहायला शिकवणारे भेटतच असतात..त्यामुळे आयुष्य आंधळ्या कोशिंबिरीचा एक भाग असला तरी 'ती' कोशिंबीर बेचव होवू देऊ नका..सगळे सप्रमाण घाला आणि आयुष्य लज्जतदार करा लहान मुलांप्रमाणे निरागस..

@ संजय जेवरीकर
पत्रकार

No comments:

Post a Comment