Thursday, April 30, 2020

कान

सकाळी कानावर पडणाऱ्या मंत्रोच्चाराने आज माझे कान तृप्त झाले.कानाने काय ऐकावे हे काही आपल्या हातात नाही,मात्र ऐकून काय साठवून ठेवावे हे आपल्या हातात नक्कीच असावे.हे कान अनेकांमुळे तृप्त झाले आहेत.लतादीदीचे सुमधुर गाणे,किशोरदाचे दर्दभरे गीत,जगजितसिंगाची गझल,भीमसेन जोशींचे अभंग,पूल,वपुंचे कथाकथन,झाकीर हुसेनचा तबला,बिस्मिल्लाहखानची सनई,प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची व्याख्याने,आफळे बुवांचे कीर्तन आणि आईची जात्यावरची गाणी अश्या कितीतरी जादूयी आवाजाने आपले कान तृप्त झाले आहेत.या सगळ्यांचा धागा एकच तो म्हणजे स्वर,लय आणि भावगर्भता.. किती किती ऐकत राहावं अस नेहमी मला वाटत आलं आहे.या सगळ्यामध्ये सध्याची पिढी हनिसिंगची दिवानी आहे हेही नसे थोडके..डोळ्यांनी पाहावं आणि कानाने ऐकण्याचे काम करावं..तृप्तीची ढेकर आली की समजावं सगळं मनापर्यंत पोचल. कान शांत करण्याची ताकद ज्या शब्दात असते ते पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते..जे आवडत ते पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटणं ही त्या कलाकृतीची कमाल असते.कानात रुंजन घालणारे शब्द ही त्याची किमया असते.दिवसभर त्या शब्दात आपण अडकून पडतो..शब्दांची ताकद अनुभवता येणं ही खरी ऐश्वर्यसंपन्नता आहे.जगायचं असतं शब्दांसाठी आणि मरायचं असतं शब्दांसाठी,म्हणूनच कानसेन होऊन जगणं मला आवडत..कानाच्या कायम तृप्तीसाठी आयुष्यभर मला कानसेन होऊन जगायला आवडेल,मात्र तितकं भरभरून देणारे शब्द कानापर्यंत यायला हवेत,आणि मनाला चिंब भिजवायला हवे...

@ संजय जेवरीकर

No comments:

Post a Comment